गोष्ट आहे इथली भारतातलीच जेव्हा इथं इंग्रजांचं राज्य होतं..
कुठल्यातरी लोहमार्गावर प्रवाश्यांनी खच्चून भरलेली रेल्वे चालली होती आणि प्रवाश्यात काही मोजक्या भारतीयांसोबत बरेचसे इंग्रज मंडळीही होते..
त्या रेल्वेच्या एका डब्यात साध्या पोशाखातला एक सावळासा शिडशिडीत तरुण प्रवासी शांतपणं खिडकीबाहेरचा निसर्ग न्याहाळत होता..
त्या तरुणाचं रंगरूप आणि कपडे बघून त्याला अडाणी समजणारे काही इंग्रज प्रवासी आपसात कुजबूज करत हसत होते..
‘आपल्यालाच हसतायेत’ हे ठाऊक असूनही तो साधा सावळा तरुण त्यांचाकडं लक्ष्य न देता आपल्याच विचारात दंग होता आणि हे बघून त्याच्याबद्दल कुजबूज करणारे जास्तच हसत होते..तेवढ्यात ‘त्या’ तरुणानं अचानक उभं रहात रेल्वेची साखळी खेचली..
एव्हाना रेल्वेनं वेग पकडला होता पण या तरुणानं साखळी ओढल्यानं रेल्वे अचानक थांबली..
हा आपली तक्रार करतो की काय?याला इथं उतरायचं तर नसेल?वेडा तर नाही? सहप्रवाश्यांच्या मनात एक ना अनेक शंका डोकावल्या..
काहींनी तर त्याला बावळट,मुर्ख म्हणत शिव्याही घातल्या..
तेवढ्यात डब्यात गार्ड आला आणि त्यानं अंमळ रागातच विचारलं,”कुणी आणि का साखळी खेचली रे ?”
साखळी खेचणारा साधासा तो तरुण पुढं आला ‘मी खेचली’ त्याचं हे उत्तर ऐकून गार्डनं त्याला खालून वर न्याहाळलं आणि काही बोलणार तोच तरुण पुढं सांगू लागला,”मला वाटतं इथून साधारण काही फर्लांग अंतरावर रेल्वेचा रूळ तुटलाय.”
“ॲंऽऽ तुला इथूनच कसं कळलं बुवा?” गार्ड अद्यापही रागातच होता..
“महोदय..गाडीच्या नैसर्गिक वेगात थोडा फरक पडलाय आणि रुळांतून येणारा आवाजही मला काहीसा बदलल्यासारखा वाटतोय..ही धोक्याची घंटा आहे..”
“अच्छा एवढी हुशारी?चल बघूनच घेऊ” म्हणत गार्ड त्या तरुणाला घेऊन डब्यातून खाली उतरला..
फर्लांगभर अंतरावर बघतो तर काय? एका ठिकाणी रुळाचा जोड खरोखरच निखळला होता आणि नटबोल्ट इतस्तत: पसरले होते.. हे सगळं बघून इतर प्रवाश्यांचे अन् विशेषत: इंग्रजांचे तर डोळे पांढरे झाले..
त्या साध्याश्या तरुणाच्या समजदारीमुळं मोठा अपघात टळला होता..लोकं त्याचं कौतूक करू लागले..
इंग्रजासोबतच गार्डलाही स्वत:ची क्षणभर लाज वाटली ‘आपलं नाव?’ त्यानं अदबीनचं तरुणाला विचारलं..
“मी मोक्षगुंडम विश्वेशरैय्या..मी एक अभियंता आहे”
त्याचं नाव ऐकून सगळेच क्षणभर स्तब्ध झाले कारण या नावानं तोपर्यंत देशभरात ख्याती मिळवली होती..
लोकं त्या तरुणाची माफी मागू लागले..”अरे पण तुम्ही माफी का मागताय?” विश्वेशरैय्यांनी हसत विचारलं..
“ते..आम्ही..तुमची जरा खिल्ली..”
“मला तर नाही बुवा काही आठवत” मंद स्मित करत विश्वेशरैय्यांनी सगळ्यांना लागलीच माफही करून टाकलं..
१८८३साली अभियांत्रिकी परिक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विश्वेश्वरैय्यांचं पहिलं प्रेम ‘स्थापत्य अभियांत्रिकी’ अर्थात सिव्हिल इंजिनिअरींग..
आपल्या करीयरच्या पहिल्या काही वर्षातच त्यांनी कोल्हापुर-बेळगाव-धारवाड-विजापूर-अहमदाबाद-पुणे इथं शहरांसाठी राबवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत भरपूर काम केलं..
१९०९ साली त्यांची म्हैसुर राज्याचा मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती झाली सोबतच रेल्वेचं सचिवपदही मिळालं..
तिथं ‘कृष्णराज सागर’ धरणनिर्मितीत त्यांच्या योगदानाबद्दल भरपूर चर्चा झाली कारण यामुळं प्रचंड मोठं क्षेत्र पाण्याखाली आलं होतं आणि वीजनिर्मितीसोबतच म्हैसुर-बंगलोर या शहरांना पाणीपुरवठाही झाला..
‘कृष्णराज सागर’ धरण विश्वेशरैय्यांच्या तांत्रिक कौशल्याचं अन् प्रशासकिय वकुबाचं प्रतिक ठरलं..
आता सोपं वाटत असेल पण त्याकाळी इतकी मोठाली धरणं बांधणं तांत्रिकदृष्ट्या प्रचंड अवघड होतं..
हायड्रोलिक इंजिनिअरींग तितकीशी विकसित नव्हती आणि सगळ्यात मोठं आव्हान तर सिमेंटचं होतं..
इतकं सिमेंट आणायचं कुठून? तेव्हा देश याबाबतीत संपुर्णपणे आयातीवर अवलंबून होता आणि थोडक्यात सांगायचं तर ऐपतही नव्हती..
जलाशयात पाणी नियंत्रित करण्यासाठी विश्वेशरैय्यांनी पुस्तकापलिकडं जात विशेष तांत्रिक प्रयोग केले..
त्यांनी धरणाच्या भिंतीजवळ विहिरीसदृश्य गोलाकार संरचना केली आणि त्यांना स्वयंचलित दरवाज्यांशी जोडलं आणि दरवाजे धरणाच्या भितींच्या आत बसवले..
यातल्या १७१ दरवाज्यांपैकी ४८ लोखंडी दरवाजे भद्रावतीच्या पोलाद कारखान्यात बनवले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रत्येक दरवाज्यावर दहा टनांचा भार असूनही ते स्वत: वर खाली होऊ शकत होते..
जेव्हा जलाशयात पाण्याची पातळी वाढायची तेव्हा पाणी विहिरीत पडायचं ज्यामुळं विहिरीची पातळी वाढून स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडून जायचे आणि अतिरिक्त पाणी निघून जायचं अन् विहिरीची पातळी जशी कमी व्हायची तसे दरवाजे आपोआप बंद होऊन पाण्याचा प्रवाह थांबत होता..
संपुर्ण जगभरात असं अभिनव तंत्र पहिल्यांदाच वापरलं जात होतं याची नंतर युरोपासह इतर अन्य देशात काॅपी झाली..
‘धरणाची उंची न वाढवता त्याची जलक्षमता वाढवणं’ ही कल्पना कुणाच्या स्वप्नात देखील आली नसेल पण
विश्वेशरैय्यांनी ते करून दाखवलं ते ही इथं पुण्यातल्या खडकवासल्यात..
‘मुठा’ नदीच्या पुराला नियंत्रित करण्यासाठी त्यांनी खडकवासला धरणावर पहिल्यांदाच स्वयंचलित दरवाज्यांचा प्रयोग केला होता..या प्रयोगाचं त्यांनी पेटंटही घेतलं होतं..
धरण निर्मितीसोबतच विश्वेश्वरैय्यांनी देशाच्या औद्योगिक विकासातही भरिव असं योगदान दिलं..
धरण आलं तशी वीज आली आणि जशी वीज आली तसे उद्योगधंदे बहरू लागले..
औद्योगिकीकरणाचे खंदे समर्थक असल्यानं त्यांनी बंगलोर इथं ‘भारतीय विज्ञान संस्थान’ या ठिकाणी धातुकाम विभाग-वैमानिकी-औद्योगिक दहन आणि अभियांत्रिकी अश्या अनेक विभागांची पायाभरणी केली..
औद्योगिकीकरणास त्यांचा फक्त ढोबळ पाठिंबा नव्हता यामागं देशांतर्गत अशिक्षितपणा-गरीबी-बेरोजगारी-अनारोग्य याबाबत मुलभूत असं चिंतन होतं..
उद्याेगधंद्यांचा अभाव-सिंचनासाठी मान्सूनवरची अवलंबिता-पारंपरिक कृषी पद्धती-प्रयोगांची कमतरता यामुळं विकासात येणारा अडथळा रोखण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम करत आपल्या कार्यकाळात म्हैसूर राज्यातल्या शाळांची संख्या ४५००वरून १०,५०० पर्यंत नेली फलस्वरुप विद्यार्थ्यांची संख्या १,४०,००० वरून ३,६६,००० पर्यंत वाढली..
मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहासोबतच पहिलं फर्स्ट ग्रेड काॅलेज सुरू करण्याचं श्रेयही त्यांचंच..
सोबत म्हैसूर विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता..
हुशार मुलांना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती,शेतकी-अभियांत्रिकी-औद्योगिक प्रशिक्षणासाठी महाविद्यालये यासाठी त्यांनी दुरगामी नियोजन केलं..
‘उद्योगंधदे म्हणजे देशाची जीवनरेखा’ असं मानत त्यांनी रेशम-चंदन-धातू-स्टिल अश्या उद्योगांना जर्मन आणि इटालियन तंत्रज्ञांच्या मदतीनं विकसित केलं..
त्यांची धडपड आणि आशावाद निव्वळ स्वप्नाळू होता असं नाही तर ‘फंड’ हे वास्तव ध्यानात घेऊन त्यांनी बॅंक ऑफ म्हैसूरची मुहूर्तमेढ रोवली..
तब्बल ४४वर्षे सक्रिय सेवा देऊन १९१८साली विश्वेश्वरैय्या लौकिकार्थानं निवृत्त झाले तरी त्यांनी समाजजीवनातलं आपलं काम सोडलं नाही किंबहुना अडीअडचणीला भारतीय अभियंत्यांना प्रशिक्षित करून अनेक बंद पडलेली कामं मार्गी लावली..
म्हैसूरमध्ये ऑटोमोबाईल आणि एअरक्राफ्ट फॅक्टरीचं स्वप्न बघत त्यांनी एचएएल आणि प्रिमिअर ऑटोमोबाईलचं बीज पेरलं आणि निवृत्तीनंतरही बख्खळ काम करून ठेवलं..
आपल्या आयुष्यात संख्य असंख्य बहुमानांनी सन्मानित झालेल्या त्यांना १९५५ साली वयाच्या ९५व्या वर्षी जेव्हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ जाहिर झाला तेव्हा त्यांनी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंना एक पत्र लिहिलं,”मला या उपाधीनं सन्मानित केलं म्हणून मी तुमचं कौतूक करेल अशी अपेक्षा तुम्ही बाळगलीत तर तुमच्या पदरी निराशा पडेल..मी सत्यांच्या मुळाशी जाणारा माणुस आहे”
नेहरूंनी त्यांच्या या पत्राची प्रशंसा करत त्यांना “राष्ट्रिय घडामोडींवर बोलणं-शासकिय धोरणांवर टिका करण्याचं स्वातंत्र्य नेहमी अबाधित असेल..पुरस्कृत करणं म्हणजे शांत बसवणं नव्हे”असं उत्तर दिलं..
वयाची शंभरी उलटल्यानंतरही विश्वेशरैय्या कार्यमग्न राहिले आणि १४ एप्रिल १९६२ या दिवशी रुढार्थानं हे जग कायमचे सोडून गेले असले तरी इतिहासात त्यांचं नाव कायमचं कोरून गेलं..
विश्वेश्वरैय्या हे ना जन्मानं महान होते,ना त्यांना कुठला दैदिप्यमान वारसा होता,ना हे महात्म्य त्यांचावर कुणी थोपवलं होतं..
कठिण परिश्रम-ज्ञानपिपासु वृत्ती-अथक प्रयत्न-समाजाभिमुख वर्तन यामुळं त्यांना हे ‘महात्म्य’ प्राप्त झालं होतं..
प्रचंड बुद्धिमान अभियंता-तितकेच कुशल प्रशासक असणाऱ्या विश्वेशरैय्यांचा जन्मदिन त्यांच्या सन्मानार्थ ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो.
या ऋषितुल्य व्यक्तित्वाला विनम्र अभिवादन.....
-- व्हाट्स ऍप वरून साभार
माहिती रंजन समूह