Friday, June 2, 2023

श्री शिवराज्याभिषेक दिनी किल्ले सिंहगडावर पालखी सोहळा



श्री शिवराज्याभिषेक दिनी किल्ले सिंहगडावर पालखी सोहळा

विश्व हिंदू परिषद पुणे श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) तर्फे आयोजन 

पुणे : विश्व हिंदू परिषद, पुणे श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) च्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शु. त्रयोदशी नृपशालिवाहन शके १५९६ या दिवशी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. त्या प्रसंगाचे मूक साक्षीदार म्हणजे स्वराज्यातील गड किल्ले होय. त्यामुळे श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन प्रत्येक गड किल्ल्यावर झाले पाहिजे. याउद््देशाने समितीने किल्ले सिंहगड येथे हा सोहळा आयोजित केला आहे. रविवार, दिनांक ४ जून रोजी सकाळी १० वाजता सिंहगडावर पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्राचे मंत्री संजय मुरदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उपाध्यक्ष शरद जगताप, सचिव श्रीकांत चिल्लाळ, श्रीपाद रामदासी आदी उपस्थित होते.

किशोर चव्हाण म्हणाले, अभिवादन सोहळ्याचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे. सोहळ्याचा प्रारंभ रविवारी सकाळी ८ वाजता छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅलीने होणार आहे. विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, धायरी फाटा, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे, सिंहगड पायथा या मार्गाने सिंहगडावरील वाहनतळ येथे रॅलीचा समारोप होईल. सोहळ्यामध्ये हजारो शिवभक्त सहभागी होणार आहेत.

ते पुढे म्हणाले, रविवारी सकाळी १० वाजता सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी मिरवणुकीत ढोल-ताशा पथक, शंखनाद पथक आदी सहभागी होणार आहेत. यावेळी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन देखील करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे वेदपठण देखील होणार आहे.

सोहळ्याकरता पाहणी करत असताना छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधी स्थळाची पडझड झालेली दिसली, त्यामुळे त्या स्थळाची दुरुस्ती किंवा पुर्नबांधणी करण्यात यावी, तसेच किल्ले सिंहगड येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचे पूर्णाकृती पुतळे बसवले जावेत, अशी मागणी करत, समिती यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कार्यक्रमस्थळी निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समितीचे उपाध्यक्ष शरद जगताप म्हणाले, सोहळ्याला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सरनोबत सरसेनापती येसाजी कंक यांचे थेट वंशज आकाश कंक, अनमोल कंक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सिंहगडावरील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांचे पूजन देखील यावेळी होणार आहे. त्याच प्रमाणे, पर्यावरण संवर्धन ही बाब लक्षात घेऊन रॅली दरम्यान सीड बॉम्ब चे रोपण करण्यात येणार आहे. पर्यटकांनी रविवारी सकाळी ८ ते दुपारी २ यावेळेत चारचाकी वाहने घेऊन येणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यंदाचे वर्ष हे श्री शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाची सुरुवात असल्याने, समितीतर्फे इतिहास चिकित्सा, दुर्ग चिकित्सा, ऐतिहासिक व्यक्तिमत्वे, ऐतिहासिक ग्रंथ परिचय, शिवकालीन शस्त्रकला आदी बाबींचा समावेश असणारी, शिवशक ही स्मरणिका प्रकाशित होणार आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती स्मरणिकेचे संपादक श्रीपाद रामदासी यांनी दिली.


श्री शिवराज्याभिषेक दिनी किल्ले सिंहगडावर पालखी सोहळा

श्री शिवराज्याभिषेक दिनी किल्ले सिंहगडावर पालखी सोहळा विश्व हिंदू परिषद पुणे श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) तर्फे आयोजन  ...